News & Events
अथक परिश्रमाने बँक उच्च शिखरावर : प्रकाश पाठक, अकोला अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
July 20, 2026
अकोला अर्बन बँकेने नुकतीच 60 वर्षे पूर्ण केली आहेत. या 60 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत बँकेने अनेक चढ-उतार पार केले. आजचा हिरक महोत्सव हे कर्मचार्यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे, असे प्रतिपादन प्रकाश पाठक यांनी केले. ते अकोला अर्बन बँकेच्या हिरक महोत्सव उद्घाटन सोहळ्यात रविवार, 26 नोव्हेंबर रोजी बोलत होते. गोरक्षण मार्गावरील शुभमंगल फंक्शन सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीश लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांची उपस्थिती होती.
समाजातील वंचित, उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसह महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकेने अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. बँकेची मजबूत स्थिती प्रेरणादायी आहे. त्यासाठी बँकेच्या कर्मचार्यांनी विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी भूतकाळात जे अविरत कष्ट केले आणि वर्तमानात जे कष्ट करीत आहेत ते अनेकांसाठी दिशादर्शक असल्याचे मत प्रमुख वक्ते प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपणा सर्वांचे आदर्श छत्रपती शिवराय आहेत. योगायोगाने शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे तर बँकेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवरायांच्या जीवनातील त्याग, तपस्या या आदर्शांना स्मरूण बँकेला उच्च शिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सहकार भारतीने, सहकारी क्षेत्रातील बँकांच्या समस्या आरबीआयकडे पोहोचण्यासाठी जोरदार पाठपुरावा करून सर्व सहकारी बँकांच्या समस्या ऐकण्यासाठी एका नोडल अधिकार्याची नियुक्ती केली आहे. हे सहकार भारती मुळेच शक्य झाले, असे सांगत महाराष्ट्र प्रांताचे सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांनी बँकेला हिरक महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेचे संचालक मंडळ, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील 34 शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी व अकोल्यातील शाखा निरीक्षक समितीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमात २६/११च्या आतंकी हल्ल्यात वीरमरण आलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन पूजा परांजपे, अमोल तेलपांडे यांनी केले. आभार महेश जोशी यांनी मानले.